यावर्षीही समाधानकारक पाऊस
शेतकऱ्यांनो पूर्वसूचना देतो तुमचे नुकसान होऊ देणार नाही-
पंजाबराव डख
यांचे प्रतिपादन
औसा प्रतिनिधी
दरवर्षी मुंबई कडील अरबी समुद्रातून पाऊस येत असल्यामुळे मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी होते. परंतु मागील तीन वर्षापासून पूर्वेकडून पावसाचे आगमन होत असल्यामुळे याही वर्षी समाधानकारक पाऊस पडणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. मी हवामानाचा अचूक अंदाज देतो, या अंदाजामुळे तुमचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही असे प्रतिपादन प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी केले. दावतपूर ता. औसा येथे खरीप हंगाम पूर्व ग्रामस्तरीय शेतकरी मेळाव्यास संबोधित करताना ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी महेश क्षिरसागर हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर सरपंच शिवदास कांबळे, उपसरपंच विठ्ठल बेडजवळगे, लामजना विभागाचे मंडळ कृषी अधिकारी, रेवशेट्टे, कृषी सहाय्यक आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना पंजाबराव डख पुढे म्हणाले मागील तीन वर्षापासून पावसाने दिशा बदलली आहे. उष्णतेचे प्रमाण वाढले असून सिमेंटची घरे, कारखाने, आणि बेसुमार वृक्षतोड यामुळे तापमानात वाढ होत असल्यामुळे पाऊस कमी होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची चिंता करण्याचे कारण नाही. महाराष्ट्रातील हवामानाचा आपण भरपूर अभ्यास केला असल्यामुळे हवामान खात्याचा अंदाज अचूकपणे आपण सांगू शकतो म्हणून शेतकऱ्यांना आता काळजी करण्याचे कारण नाही. आपण सांगितलेल्या हवामानाचा अंदाजानुसार दक्षता घेतल्यास शेती पिकाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान टाळता येते. मी अचूक अंदाज वर्तवितो तुमचे कोणतेही प्रकारचे नुकसान होऊ देणार नाही, अशी शाश्वती त्यांनी याप्रसंगी बोलताना दिली. हवामानाचा आणि पावसाचा अंदाज निसर्गाचा लहरीपणा वाढत चालल्यामुळे झाड, पाणी, प्राणी, पक्षी यांच्या वरूनही अंदाज सांगता येतो. तर बिब्याच्या झाडास फुले जास्त प्रमाणात लागल्यास, आंबा आणि चिंचेच्या झाडास फळे जास्त लागल्यास, दुष्काळाची पूर्व सूचना समजावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. पंजाबराव डख यांनी केवळ पावसाचाच नाही तर गारपिट मुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान, वीज पडल्यामुळे येणारे संकट,व घ्यावयाची खबरदारी याची माहिती दिली. जमिनीची धूप थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. निसर्गाचा लहरीपणा वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांनी निसर्गाच्या बरोबरीने आता शेती करणे आवश्यक आहे. सुधारित पद्धतीची बियाणे, पिकाच्या दोन्ही ओळीतील ठराविक अंतर, तसेच योग्य प्रकारचे कीटकनाशक, खते याचा वापर आणि पेरणीपूर्व मशागत आणि पेरणीनंतर अंतर्गत मशागत या सर्व बाबीवर उत्पादन अवलंबून असते त्यामुळे जास्तीचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले. शेतकरी मेळाव्यामध्ये उपविभागीय कृषी अधिकारी महेश क्षीरसागर यांनी कृषी खात्यामार्फत शेतकऱ्यांना विविध अनुदानित योजनांची सविस्तर माहिती दिली. तर श्री वाघमारे यांनी गोगलगायी मुळे येणारे संकट व गोगलगायीच्या बंदोबस्त करण्यासाठीच्या उपाययोजना याबद्दलची शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच विठ्ठल बेडजवळगे यांनी केले. शेतकरी मेळाव्यासाठी करजगाव, दावतपूर, वाघोली, फत्तेपुर, चलबुर्गा, उत्का,तपसे चिंचोली,नागरसोगा ,लामजना आदि गावातील शेकडो शेतकरी ,सरपंच,उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री उमाकांत बिराजदार, जयशंकर बिराजदार, आणि शेसूबाग शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य प्रयत्नशील होते.
0 Comments