औसा शहरातील रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा आ. पवार यांच्या आवाहनांस व्यापाऱ्यांचा प्रतिसाद
 औसा प्रतिनिधी 
औसा शहरातील मुख्य रस्त्याच्या रस्ता रुंदीकरणाचा तिसरा टप्पा मागील अनेक दिवसांपासून रखडला होता. तिसऱ्या टप्प्यातील रस्ता रुंदीकरणाचे काम रखडल्यामुळे नागरिकांची अत्यंत गैरसोय होत असून शहरात छोटे-मोठे अपघात होत होते. तसेच सतत वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे व रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे शहरातील नागरिकांना या रस्त्यावरून पायी चालणे अथवा वाहन चालविण्यासाठी अत्यंत गैरसोयीला तोंड द्यावे लागत होते. तिसऱ्या टप्प्याच्या रस्ता रुंदीकरणाचे काम मार्गी लागावे म्हणून आमदार अभिमन्यू पवार यांनी पाठपुरावा करून 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. डिसेंबर 2022 मध्ये या रस्ता रुंदीकरणासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून औसा शहरातील व्यापाऱ्यांनी शहराच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा न करता रस्ता रुंदीकरणाच्या कामी सहकार्य करावे असे आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी गुरुवार दिनांक 6 एप्रिल रोजी येथील प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित आढावा बैठकीमध्ये केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार भरत सूर्यवंशी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अजिंक्य रणदिवे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी म्हणाले की, शासन निकषाप्रमाणे मालमत्ता धारकांना आपल्या जागेचा मावेजा मिळेल, त्यासाठी सर्व मालमत्ता धारकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. औसा शहरातील मालमत्ता धारक व मुख्य रस्त्यावरील व्यापाऱ्यांनी शहर विकासासाठी आम्ही सहकार्य करू अशी भूमिका स्पष्ट केली. आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यास यश आले असून अखेर औसा शहरातील तिसऱ्या टप्प्याच्या मुख्य रस्ता रुंदीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. बैठकीसाठी कापड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश उटगे, माजी नगरसेवक बंडू कोद्रे, सुनील उटगे, जैन मंदिर ट्रस्टचे रमेश दूरुगकर, मुकेश देशमाने, अर्जुन ढगे यांच्यासह इतर व्यापारी व मालमत्ता धारक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments