बनावट कागदपत्राव्दारे शेतकरी असल्याचे दाखवून केले जमिनीचे खरेदीखत

नोंदणी महानिरीक्षकाकडे तक्रार, नोंदणी कायद्याचे उल्लंघन, कार्यवाहीची मागणी

औसा
मौजे कार्ला ता.औसा येथील शिवारात असलेल्या जमिनीचे खरेदीखत करताना नोंदणी कायद्याचे उल्लंघन करत शासनांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला.यात जमिन खरेदीदार हा शेतकरी किंवा कुटुंबात कुणाच्याही नावे जमिन नसतानाही सासऱ्याच्या नावे किल्लारी शिवारात सर्वे.नं.६६/अ मध्ये जमिन असल्याचे बोगस सातबारा लावून दाखविण्यात आले.वास्तविक पाहता त्या सातबाऱ्यात घेणाऱ्यासह सासऱ्याच्या नावे जमिन नसतानाही शेतकरी असल्याचे दाखवून नियमबाह्य पध्दतीने खरेदीखत केल्याप्रकरणी नोंदणी महानिरीक्षक पुणे, उपविभागीय पोलीस अधिकारी औसा यांच्यासह सह जिल्हा निबंधकाकडे तक्रार करण्यात आली.यात दोषींवर कायदेशीररित्या गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदार फातीमा उर्फ फतरुबी दस्तगीर शेख यांनी केली.

१७ ऑक्टोबर २०२२ रोजी खरेदीखत क्रं.३६६१,३६६६ मध्ये जमिन घेणार दर्शना युवराज गायकवाड व ठकुबाई युवराज गायकवाड यांनी औसा दुय्यम निबंधक येथून खरेदीखत करुन घेतले.यात दोन्ही घेणार यांनी कार्ला ता.औसा येथील सर्वे.नं.२१७/क मधील अनुक्रमे ६० आर व ७० आर जमिनीची खरेदी केली.यात त्यांनी नमुद केले की, सासऱ्याच्या नावे किल्लारी शिवारात सर्वे.नं.६६/अ मध्ये असल्याने आमच्या कुटुंबात शेती आहे.वास्तविक पाहता सदरील सातबाऱ्यात खरेदीदाराच्या सासऱ्याचे नाव दिसत नसून याबाबत तक्रारदारांने पुरावे जोडले आहेत.आडनाव समान असल्याने ते कुटुंबातील सदस्य असल्याचे दाखवून शासनाची दिशाभूल करत भारतीय नोंदणी कायद्याचे भंग केली.यासह घेणार देणाऱ्यांनी दुय्यम निबंधकांना हाताशी धरुन बोगस कागदपत्राव्दारे खरेदीखत केल्याचे  तक्रारीत म्हटले आहे.

खरेदीखत नियमानुसार,दिलेल्या माहीतीची तपासणी होईल
-------------------------------
सबंधित महिला तक्रारदारांनी वरील प्रकाराबाबत तक्रार केली आहे.पण सदरील दस्तावेज नियमानुसार करण्यात आले.घेणार हा शेतकरी किंवा शेतकरी कुटुंबातील असणे आवश्यक आहे.त्यांनी खरेदीखतावेळी घोषणापत्र व सातबारा दिल्याने खरेदीखत केले.तरीही तपासणी करुन वरिष्ठांना कळवू,असे दुय्यम निबंधक विशाल जगदाळे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments