भारताच्या आरोग्य समृद्धीसाठी योगाशिवाय पर्याय नाही- संजीवनी माने यांचे प्रतिपादन
औसा प्रतिनिधी
योगगुरु रामदेव बाबा यांनी भारत देशाला आरोग्याच्या दृष्टीने समृद्ध बनण्यासाठी योग अभ्यास करून देशवासीयांना योगाचे शिक्षण दिले. बदलत्या काळामध्ये माणसाला अनेक शारीरिक विकार जुडल्यामुळे अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जून हा योगदिन म्हणून घोषित केला आहे. संपूर्ण जग आज योग अभ्यासाकडे झुकले असून भारत देशाच्या आरोग्य समृद्धीसाठी योगाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन भारत स्वाभिमान अंतर्गत पतंजली योग समितीच्या राज्य उपाध्यक्ष संजीवनीताई माने यांनी केले. औसा येथील मुक्तेश्वर विद्यालय सभागृहामध्ये आयोजित पतंजली योग समितीच्या बैठकीस संबोधित करताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्नी शोभाताई पवार ह्या होत्या. पतंजली योग समितीच्या माध्यमातून आरोग्याचे रक्षण करण्यासाठी योग शिक्षण मोफत दिले जात आहे. तसेच प्रत्येक माणसाला सकस आहार मिळावा म्हणून पतंजली योग विज्ञान समितीच्या माध्यमातून अनेक शुद्ध आयुर्वेदिक उत्पादने तयार केली जात आहेत. संस्कृती प्रधान भारत देशामध्ये योगाचा अभ्यास करून प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियमित योगासने केल्यास कुठल्याही प्रकारचे आजार होऊ शकत नाहीत हे त्यांनी स्वतःच्या अनुभवावरून स्पष्ट केले. नियमित योगाने अनेकांचे दुर्धर आजार नष्ट झाल्याचा दाखला त्यांनी याप्रसंगी उपस्थितांना दिला. याप्रसंगी अनुराग नेताजी सावंत या शालेय विद्यार्थ्यांने रोमहर्षक योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. हे प्रात्यक्षिक पाहून उपस्थितांनी बालकाचे कौतुक केले. तसेच मान्यवरांच्या हस्ते अनुराग सावंत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी माधुरी शास्त्री, मीना भोसले, मीनाक्षी स्वामी, सुमन पवार, कलावती भातांब्रे, डॉ. कविता शेळके, उमा घाडगे, आणि प्राचार्य, राजाभाऊ खंदाळे, निशांत देशमुख, दयानंद चव्हाण, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. मुक्तेश्वर विद्यालय औसा येथे आयोजित पतंजली योग समितीच्या बैठकीसाठी औसा येथे नियमित योग करणारे अनेक साधक- साधिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका प्रभारी नेताजी सावंत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पतंजली योग समितीच्या तालुका महिला प्रभारी छाया शेवाळे, सिद्धेश्वर शिराळ गोविंद जगताप, दीपमाला चव्हाण इत्यादींनी सहकार्य केले.
0 Comments