महिला काँग्रेसच्या वतीने जवाब दो मोदी आंदोलन
औसा प्रतिनिधी
सन 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामध्ये सैन्य दलातील 44 सैनिक देशासाठी शहीद झाले. या घटनेचा तपास करण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्याही प्रकारचे ठोस पाऊल उचलले नाही. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यासाठी केंद्र सरकार संपूर्णपणे जबाबदार असून केंद्र सरकारची या घटनेमध्ये अक्षम्य चूक आहे असे माहिती सत्यपाल मलिक यांनी निदर्शनास आणून दिली असताना त्यांना गप्प बसण्यास सांगितले. 44 सैनिक शहीद झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झालेला असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार या घटनेपासून जनतेची दिशाभूल करीत राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप महिला काँग्रेसने जवाब दो मोदी आंदोलन करीत केंद्र सरकारचा तीव्र निषेध नोंदविला. छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या माजी आमदार डॉ कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष विद्याताई पाटील, जिल्हा अध्यक्ष हेमाताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष दिपाली मिसाळ, काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉ पवन डोंगरे यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या शेकडो महिला व पक्षाचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
0 Comments