शॉर्टसर्किटने गोठा जळाल्याने सुमारे दोन लाखाचे नुकसान

औसा प्रतिनिधी 
औसा शहरातील सर्व्हे नंबर २४० मधील  मौलाना अमजद सिद्दीकी यांच्या वानवडा रोड लगतच्या शेतातील गोठा जळाल्यामुळे सुमारे दोन लाख रुपयाचे नुकसान झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की मौलाना अमजद सिद्दीकी यांचे वानवडा रोड लगत सर्वे नंबर २४० मध्ये दोन एकर शेत जमीन असून या जमिनीमध्ये त्यांनी जनावराच्या गोठ्यामध्ये शेतातील पशुधन बांधण्यासाठी तसेच शेतमाल ठेवण्यासाठी व कृषी अवजारे ठेवण्यासाठी शेड बांधले होते. या शेडमध्ये असलेले बोर आणि मोटारीचे वायर तसेच स्प्रिंकलर पाईप, नोजल आणि ठिबक सिंचनच्या पाईपसह अंदाजे दोन लाख रुपयाचे शेतीसाठी लागणारे साहित्य जळून आगीच्या भक्षस्थानी पडले आहे. या ठिकाणी सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नसली तरी महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला असल्याची माहिती मौलाना अमजद सिद्दीकी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. शॉर्टसर्किटमुळे झालेल्या नुकसानीचा तात्काळ मोबदला मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.

Post a Comment

0 Comments