सौ रुक्मीनबाई फुलमाळी यांचा स्मृतिगंध दरवळत राहो
------------------
औसा येथील श्री मुक्तेश्वर विद्यालयाचे सेवानिवृत्त आदर्श शिक्षक किशनराव फुलमाळी गुरुजी यांच्या धर्मपत्नी सौ रुक्मीनबाई किशनराव फुलमाळी यांनी एक वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने झुंज देत अखेरचा श्वास घेतला. माणसाच्या जीवनात मृत्यू अटळ असून मृत्यू हेच शाश्वत सत्य आहे. ज्येष्ठ पत्रकार बाबुराव देशमुख ननंदकर यांच्या भगिनी म्हणजेच सौ रुक्मीनबाई किशनराव फुलमाळी. एक आदर्श लेक, आदर्श सून आणि आदर्श माता व आदर्श धर्म पत्नी अशा अनेक भूमिकेतून प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत रुक्मीनबाई फुलमाळी यांनी संसाराची वेल फुलविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. आपले पती किशनराव फुलमाळी गुरुजी यांच्या कामांमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून समाज कार्यामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. संजीव पुस्तकालयाच्या माध्यमातून होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना माफक दरामध्ये शालेय पुस्तके बाईंडिंग करून सुस्थितीत अभ्यास करण्यासाठी उपलब्ध करून देण्यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता. सत्यवान फाउंडेशन क्लासेसच्या माध्यमातून समाजातील होतकरू गरजू व गरीब विद्यार्थ्यांना प्रसंगी मोफत ज्ञानदान करीत असताना रुक्मीनबाई फुलमाळी या कधीही कचरल्या नाहीत. थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन समाजकार्यासाठी आपल्या पतीला प्रोत्साहन देणाऱ्या रुक्मीनबाई यांचे कार्य अत्यंत उल्लेखनीय होते. किशनराव फुलमाळी गुरुजी यांची अत्यंत कडक शिस्त व इंग्रजी भाषेवरचे प्रभुत्व औसा शहराचे ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर मंदिर आणि नाथ संस्थानचे सदभक्त म्हणून सरस्वती महिला भजनी मंडळाच्या माध्यमातून त्यांचे समाज प्रबोधनाचे कार्यही उल्लेखनीय म्हणावे लागेल. सत्यवान फाउंडेशन क्लासेस मध्ये येणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना स्वतःच्या मुलाप्रमाणे व आईप्रमाणे प्रेम करणाऱ्या रुक्मीनबाई फुलमाळी यांच्या बद्दल सर्वांना नितांत आदर वाटतो. आपल्या अथक परिश्रमाने संजीव, राजीव आणि सत्यवान या तिन्ही मुलांना अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण देऊन त्यांना नवी मुंबई येथे किशन कन्स्ट्रक्शन कंपनीची स्थापना करून दिली. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला अत्यंत चांगल्या पद्धतीने पाणीपुरवठ्याचे कार्य त्यांच्या तिन्ही मुलांच्या हातून महानगरपालिकेच्या स्थापनेपासून अविरत सुरू आहे, याचा अवसेकरांना सार्थ अभिमान वाटतो. आपल्या आई वडिलांचे संस्कार व आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे तिन्ही सुपुत्र यांनी श्री संत सावता माळी मंडळ ऐरोली येथे स्थापन करून सामाजिक कार्याचा ठसा उमटविला. श्री संत सावता माळी मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन तसेच माळी समाजातील विवाह इच्छुक वधू वरासाठी वधू वर आणि पालक परिचय मेळाव्याच्या माध्यमातून सुरू असलेले त्यांचे कार्य समाजाला प्रेरणा देणारे आहे.
एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या रुक्मीनबाई फुलमाळी यांनी आपले पती किशनराव फुलमाळी यांच्या पाठीशी खंबीरपणे साथ उभी करून सुसंस्कारित, चारित्र्य संपन्न सत्शिल, धार्मिक अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करीत उद्योग व्यवसायामध्ये यशाचे शिखर गाठणाऱ्या तिन्ही मुलांच्या जीवनाला आकार दिला. प्रजापिता ईश्वरीय ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे फुलमाळी कुटुंबीय हे विद्यार्थी असून राजयोग शिक्षण केंद्राबद्दलही त्यांच्या मनामध्ये नितांत आदर भाव आहे. कोणत्याही येणाऱ्या संकटाला न डगमगता खडतर प्रवास करीत यशाचे शिखर गाठणाऱ्या रुक्मीनबाई फुलमाळी यांचे कार्याचा सुगंध दरवळत राहील म्हणून इवलेसे रोप लाविले दारी.... त्याचा वेलू गेला गगनावरी असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त माझ्या परिवारातर्फे विनम्र अभिवादन
0 Comments