किल्लारी साखर कारखान्याचे उद्या रोलर पूजन 
 औसा प्रतिनिधी 
शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारी हा औसा, उमरगा, निलंगा, आणि लोहारा या चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या सर्वात जुना साखर कारखाना असून मागील अनेक वर्षापासून विविध अडचणीमुळे हा साखर कारखाना बंद असल्यामुळे सभासद शेतकरी व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे असूनच हाल होत होते. या बाबीच्या गांभीर्याने विचार करून विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करून औसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालकीच्या सर्वात जुना साखर कारखाना चालू करण्यासाठी राज्य शासनातर्फे योग्य की मदत करावी अशी मागणी केली होती. आमदार अभिमन्यू पवार यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून व कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना न्याय दिला आणि अखेर चालू वर्षांमध्ये हा साखर कारखाना सुरू होणार असल्याने किल्लारी साखर कारखान्याच्या रोलर पूजनाचा कार्यक्रम आज रविवार दिनांक 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता कारखाना कार्यस्थळावर आमदार अभिमन्यू पवार यांच्या शुभहस्ते व प्रभारी कार्यकारी संचालक टी एन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. हा साखर कारखाना सुरू होणार असल्यामुळे मागील दोन वर्षापासून परिसरात उसाचे क्षेत्र समाधानकारक पावसामुळे वाढल्यामुळे उसाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे किल्लारी साखर कारखान्याच्या सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. किल्लारी साखर कारखान्याच्या रोलर पूजन कार्यक्रमाप्रसंगी सर्व सभासद शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमास वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, कासार शिरशी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रा भीमाशंकर राचट्टे, सुनील उटगे, काकासाहेब मोरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments