येळकोट येळकोट जय मल्हार जयघोषात मार्तंड भैरव उत्सव संपन्न 
औसा प्रतिनिधी 
मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी निमित्त मल्हारी मार्तंड भक्तांचा मार्तंड भैरव उत्सव थाटामाटाने साजरा केला जातो. औसा शहर व तालुक्यातील खंडोबा भक्तांनी आपापल्या गावागावातून काट्या कावडीची वाजत गाजत हलगीच्या साह्याने मिरवणूक काढून हा उत्सव भक्तिभावाने साजरा केला. तालुक्यातील भादा आणि मातोळा येथे चंपाषष्ठी निमित्त यात्रा भरते. या यात्रेनिमित्त पंचक्रोशीतील मल्हार भक्त, भक्ती भावानी सहभागी होतात. खंडोबाला बाजरीच्या तीळ लावलेल्या रोडग्याचा आणि वांगे कांद्याच्या पातीचा भरीत असलेला नैवेद्य दाखवून काठ्या कावडीची पूजा करून खंडोबाचे कोटंबे भरतात. खंडोबाच्या काठ्या आणि कावडी ची मिरवणूक निघाल्यानंतर वारूभक्त हातात चाबूक घेऊन येळकोट येळकोट जय मल्हार आणि शिवा मल्हारी चा येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करीत मल्हार भक्तांनी मार्तंड भैरव उत्सव तालुक्यात व औसा शहरात उत्साहाने साजरा केला. मातोळा आणि भादा येथील यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांची दंगल ही भरविण्यात आली होती.

Post a Comment

0 Comments