औसा शहरातील वराह मुक्तीसाठी अध्यक्षाला बजावली नगरपालिकेने नोटीस 
औसा प्रतिनिधी 
औसा शहरांमध्ये वराह पालनाचा व्यवसाय करणाऱ्या कैकाडी समाजाच्या अध्यक्षांना औसा नगर परिषदेने वराह मुक्तीसाठी नोटीस बजावली असून शहरातील मोकाटपणे फिरणाऱ्या वराहचा बंदोबस्त करण्याची ताकीद दिली आहे. औसा शहरात कैकाडी समाजाच्या वतीने वराह पालनाचा व्यवसाय हा वराहांना मोकाट सोडून केला जातो. वास्तविक पाहता वराह पालनाचा व्यवसाय हा बंदिस्त पद्धतीने करणे गरजेचे असताना तसे न करता वराह पालक यांनी औसा शहरात मोकाटपणे वराहचे पालन करणे सुरू केले असल्याने शहरात गल्ली बोळामध्ये वराहचा सुळसुळाट झाला असून यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. लहान मुले, वृद्ध नागरिक व वाहन चालक यांनाही मोकाटपणे फिरणाऱ्या वराहचा म्हणजे डुकरांचा अतोनात त्रास होत आहे. तसेच गल्लीबोळामध्ये डुकराचे प्रमाण वाढल्यामुळे शहरात डासाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डेंगू मलेरिया चिकनगुनिया स्वाईन फ्लू अशा साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव निर्माण होत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. औसा शहरातील मोकाटपणे फिरणाऱ्या वराहला तीन दिवसात बंदोबस्त करा अन्यथा महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायती व औद्योगिक नगरी कायदा 1965 चे कलम 294 नुसार नगरपालिका प्रशासनाच्या वतीने आपणावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. अशी नोटीस लिंबराज जाधव अध्यक्ष कैकाडी समाज यांना अजिंक्य रणदिवे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद औसा यांनी देऊन सुचित केले आहे.

Post a Comment

0 Comments