दिनकरराव माने यांच्या गुळ पावडर कारखान्याने ऊस उत्पादकांना मिळणार संजीवनी
 औसा प्रतिनिधी
 औसा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार दिनकरराव माने यांनी आशिव परिसरामध्ये दिनकरराव बिमाने ऍग्रो इंडस्ट्रीज प्रा. लिमिटेड अशिव या नावाने गुळ पावडर उत्पादनाचा कारखाना उभारला आहे. अशिव व पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हा कारखाना संजीवनी ठरणार आहे. 15  महिन्यापूर्वी भूमिपूजन करून 3 हेक्टर क्षेत्रावर  750  मॅट्रिक टन गाळपक्षमतेचा हा कारखाना उभारला असून दररोज 900 मॅट्रिक टन गाळप करता येईल असा अंदाज अमित भैया माने यांनी व्यक्त केला आहे. या कारखान्यासाठी स्वतंत्र विद्युत निर्मितीचा संच उभारला असल्याने कारखान्यासाठी लागणारी वीज याच ठिकाणी निर्माण होणार असल्यामुळे तिन्ही शिफ्ट सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. अशिव व परिसरातील मातोळा, भातागळी, कानेगाव, उजनी, काजळे चिंचोली, वांगजी, देवताळा, कवळी हिप्परगा, बेलकुंड, तावशी ताड, इत्यादी गावासह 10 ते 15  किलोमीटर अंतरापर्यंतची ऊस वाहतूक करण्याची संपूर्ण यंत्रणा उभारण्यात आली आहे. मॉडर्न इंजीनियरिंग कंपनी बारामती या तज्ञ कंपनीमार्फत कारखान्याची उभारणी करण्यात आली असून युको बँकेने अर्थसहाय्य केले असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. दिनकरराव बीमाने ऍग्रो इंडस्ट्रीज या कारखान्यातून गुळ पावडर निर्मिती करण्यात येणार असून यावर्षी दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर गळीत हंगाम सुरू करण्याचा मानस आहे. पावसाचा अंदाज पाहून परिसरातील ऊस  वाहतूक सुलभ करता यावी म्हणून पाऊस उघडताच हा गळीत हंगाम सुरू होणार असल्याने या परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कायमस्वरूपी उसाचा प्रश्न मिटणार आहे. अतिरिक्त उसाचा प्रश्न शेतकऱ्यासमोर भेडसावणार नाही. इतर कारखान्याच्या बरोबरीने आपण शेतकऱ्यांच्या उसाला भाव देणार असल्याचेही माजी आमदार दिनकरराव माने यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांच्या उसाची प्रतवारी तसेच उसाची रिकवरी पाहून शेतकऱ्यांना चांगला भाव देणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा कारखाना मागणी धरणाच्या परिसरात असल्याने या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करण्यात आली असून या परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हा गुळ पावडर निर्मितीचा कारखाना निश्चितच फलदायी ठरणार असल्याचा विश्वास दिनकरराव माने यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments