औसा तालुक्यात पावसाचा कहर
 कापणी केलेले सोयाबीन पाण्यात तरंगू लागले 
औसा प्रतिनिधी 
मागील 8 दिवसापासून संपूर्ण औसा तालुक्यामध्ये पावसाचा कहर झाला असून वातावरणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सर्व दूर पाऊस पडून शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी ढगफुटी विजा पाऊस पडून शेतकऱ्यांनी शेतात कापणी करून टाकलेले सोयाबीन अक्षरशः पाण्यावर तरंगत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. वादळ व वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीनच्या पिकाची कापणी करून गंजी लावल्या होत्या. या गंजीवरील चवाळे ताडपत्री उडून गेल्याने शेतकऱ्यांचे कापणी केलेले सोयाबीन पीक भिजले आहे. तर शेतात सोयाबीनची कापणी करत असताना अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना कापणी केलेले पीक गोळा करताना आल्याने सोयाबीन अक्षरशा शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्यावर तरंगत असून या पिकाला मोड फुटत आहेत. ग्रामीण भागातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी छोट्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. तालुक्यातील जवळगा पोमादेवी, हरेगाव, आशिव, भादा, आलमला, आदि गावातील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे नाल्याच्या अलीकडचे शेतकरी अलीकडे, आणि पलीकडील शेतकरी पलीकडेच अडकल्यामुळे शेतकरी व शेतकऱ्यांचे पशुधनाची दैना उडाली आहे. शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोबर हा शाळेचा शेवटचा दिवस असल्याने अनेक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गाव गाठता आले नसल्याने विद्यार्थी वर्गाची ही धावपळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments