औसा तालुक्यात शेकडो हेक्टर सोयाबीन पाण्यातून काढण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत
औसा प्रतिनिधी
मागील 8 दिवसापासून सतत पाऊस पडल्यामुळे अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांच्या खरीप पिकाला बसला असून औसा तालुक्यात शेकडो हेक्टर सोयाबीन पिकात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे. समतल जमिनीवरील सोयाबीन काढण्यासाठी अडचण नाही परंतु पाणथळ जागेतील व शेवाळ शेतातील सोयाबीन पदरात घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. सतत पाऊस सुरू असल्यामुळे अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला असून यावर्षी सोयाबीन पिकात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. दिवसभर गुडघाभर पाण्यातून सोयाबीनची कापणी शेतकरी शेतमजूर करीत आहेत. आठवडाभर लागलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली असून खरीप पिके कापणीसाठी पावसाचा अडथळा निर्माण झाला आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिना सुरू होताच पाऊस उघडतो परंतु यावर्षी परतीचा पाऊस लांबणीवर पडला असून ऑक्टोबर महिन्याचा तिसरा आठवडा सुरू असून सतत पाऊस लागल्याने शेतकऱ्यांना शेतातील कोणतीही कामे करता येत नाहीत. एकीकडे शेतीमालाच्या दरामध्ये घसरण झाली आहे. तर वाढत्या महागाईमुळे मजुरीचे दर वाढले असून शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च सुद्धा निघणे मुश्किल झाले असल्याने शेतकरी हातबल झाला आहे. निसर्गापुढे कोणाचेही काही चालत नसल्यामुळे औसा तालुक्यातील शेतकरी सतत नैसर्गिक संकटाचा सामना करीत आहेत. दिवाळीचा सण तोंडावर आला असून यावर्षी शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्याची शक्यता नाही कारण ऐन सणासुदीच्या दिवसात सुद्धा शेतकऱ्यांना शेतातील सोयाबीन पिकाची कापणी करावी लागणार असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.
0 Comments