*कॉम्प्युटर पार्क येथे सुशिक्षित बेरोजगारांचा मेळावा संपन्न 
औसा प्रतिनिधी
 सुशिक्षित बेरोजगार युवकांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम तसेच जिल्हा उद्योग केंद्र लातूर आणि मिटकॉन यांच्या सहकार्याने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनेचा व प्रशिक्षणाचा लाभ बेरोजगार युवकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्र मिटकॉनचे जिल्हा समन्वयक के.जी.कप्ते यांनी केले. औसा येथील कॉम्प्युटर पार्क संकुलामध्ये सुशिक्षित बेरोजगार युवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे बोलताना जिल्हा समन्वयक म्हणाले की, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध विषयाचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तरुणांना कर्ज पुरवठा करण्यात येतो. तसेच मिळणाऱ्या कर्जावर सबसिडीचा लाभ ही देण्यात येतो. या कर्ज व सबसिडी योजनेच्या माध्यमातून बेरोजगार युवकांनी स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी जीवन  जगत असताना आपल्या कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावावा असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या कार्यक्रमांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर 8 तरुणांचे कर्ज प्रकरणाचे फॉर्म भरून घेतले. हे फॉर्म भरून घेतल्यानंतर ऑनलाईन पद्धतीची प्रक्रिया पूर्ण करून तरुणांना कर्ज मिळेपर्यंत मिटकॉन त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.  यामध्ये फॅशन डिझाईन, ब्युटी पार्लर, पापड उद्योग यासह प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातील योजनांची माहिती देण्यात आली 10 ते 50 लाख पर्यंतचे कर्ज होतकरू उद्योजकांना मिळणार असल्याने या योजनेचा फायदा घ्यावा असेही त्यांनी या शिबिरामध्ये सांगितले. यावेळी कॉम्प्युटर पार्कचे संचालक प्रा. काशिनाथ सगरे यांनी प्रास्ताविक केले.  या प्रशिक्षण शिबिरामध्ये औसा तालुक्यातील 22 गावातून सुशिक्षित बेरोजगार तरुणांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा नजीर शेख यांनी केले.

Post a Comment

0 Comments