परमेश्वराच्या प्राप्तीसाठी गुरुचा सत्संग आणि भक्ती महत्त्वाची: श्रीक्षेत्र काशी जगद्गुरु 
औसा प्रतिनिधी 
माणसाच्या जीवनाची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी परमेश्वराची कृपा होणे आवश्यक आहे. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आपल्या सद्गुरूच्या सानिध्यामध्ये सत्संग घडवून  व  गुरुभक्ती करणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन १७ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता येल्लोरी ता. औसा येथील धर्मसभेत श्रीक्षेत्र काशी पिठाचे नूतन जगतगुरु श्री श्री श्री १००८ डॉ मल्लिकार्जुन विश्वराध्य महास्वामीजी यांनी केले. यावेळी धर्म पिठावर जिंतूर मठाचे ष.ब्र. १०८ श्री अमृतेश्वर शिवाचार्य, हिरेमठ संस्थांनचे पिठाधिपती ष.ब्र. १०८ निरंजन शिवाचार्य महाराज व चंद्रशेखर हिरेमठ महाराज यांची उपस्थिती होती. आपल्या अमृतवाणीतून बोलताना काशी पिठाचे जगद्गुरु पुढे म्हणाले की, हिरेमठ गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांनी मागील 50 वर्षापासून येलोरी परिसरातील सदभक्तांना अध्यात्माला विज्ञानाची जोड देऊन धर्माची शिकवण देत धर्मानेच विश्वाला शांती मिळेल असा संदेश दिला. त्यामुळे येलोरी व परिसरातील सदभक्तांनी त्यांची पन्नास वर्षापासून अखंडपणे सेवा केली. अशा सद्गुरूचा सत्संग आणि त्यांचे सानिध्य मिळाल्यामुळेच आपल्याला ईश्वर प्राप्तीचा मार्ग सुकर होतो. असे सांगून सद्गुरु ची निष्ठेने सेवा करावी असे स्पष्ट केले. गुरुच्या सेवेचे फळ हे निश्चित मिळते असे सांगून येलोरी ते मन्मथस्वामी पायी दिंडी चा मागील ११ वर्षापासून येथील सदभक्तांनी सुरू ठेवलेल्या उपक्रमाचे काशी जगद्गुरु यांनी कौतुक केले. तसेच २४ वर्षापासून महादेव मंदिरात अखंड
शिवपाठाचे पठण केले जात आहे.  प्रारंभी श्री जगद्गुरु यांची येल्लोरी गावातून सजविलेल्या भव्य रथातून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये महिला भजनी मंडळासह शेकडो सुवासिनी महिलांनी डोक्यावर अमृतकलश घेऊन जगद्गुरूंच्या नावाचा जयघोष करीत मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीमध्ये हजारो शिवभक्त सहभागी झाले होते. यावेळी जिंतूर आणि औसा येथील शिवाचार्यांचे आशीर्वचन झाले. काशी पिठाचे जगद्गुरु व उपस्थित शिवाचार्य यांचे सर्वश्री चंद्रकांत पाटील, गुंडाप्पा निटुरे, पंचप्पा येरटे, सिद्धेश्वर मुळे, गुरुलिंग येरटे, विलास बेडगे, इराप्पा बिराजदार, शिवानंद कोरे, दिलीप पाटील, वैजनाथ स्वामी, भागवत रिंगणकर, सदाशिव पाटील, नारायण बिराजदार, विश्वनाथ नरे, जगन्नाथ कारभारी, साहेबराव कारभारी, यांच्यासह ग्रामस्थांनी महावस्त्र अर्पण करून गौरव केला. येलोरी येथील धर्मसभेला पंचक्रोशीतून हजारो भक्तगणांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी सी पाटील यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments