जिल्हा बँकेच्या बुधोडा शाखेत निवारा नसल्यामुळे वृद्ध नागरिकांची गैरसोय 

औसा प्रतिनिधी 
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बुधोडा येथील शाखे समोर निवारा नसल्यामुळे जेष्ठ नागरिक, महिला व शेतकरी खातेदारांची पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. मागील एक महिन्यापासून सतत पाऊस असल्यामुळे जिल्हा बँकेमध्ये पैसे उचलण्यासाठी येणारे शेतकरी खातेदार तसेच श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन उचलण्यासाठी येणाऱ्या लोकांची बँकेसमोर तोबा गर्दी होत आहे. बँकेसमोर कसल्याही प्रकारचा निवारा नसल्यामुळे बँक व्यवहार करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. या ठिकाणी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेने किंवा ग्रामपंचायतीने पावसाळा असल्यामुळे तात्पुरता प्लास्टिक मंडप टाकून निवारा करावा अशी मागणी होत आहे. या कामी जिल्हा बँकेचे प्रशासन व ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असून बुधोडा व परिसरातील खातेदारांना पावसाळ्यामध्ये अत्यंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. वृद्ध नागरिक व महिला दिवसभर पावसात चिखलात बसत आहेत. बँकेसमोर बसण्यासाठी पुरेशी जागाही उपलब्ध नसल्यामुळे व निवारा नसल्यामुळे होत असलेली गैरसोय तात्काळ दूर करावी अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments