संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील समर्पितांच्या वेदना आजही कायम: श्रीमती कोमल साळुंखे 
औसा प्रतिनिधी
 संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अनेक क्रांतिकारांनी  आपल्या प्राणाची आहुती दिली. मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, तसेच मराठी भाषिकांच्या अस्मितेचा असणारा आजच्या कर्नाटकातील बेळगाव, कारवार, निपाणी हा प्रदेश संयुक्त महाराष्ट्रामध्ये विलीन व्हावा ही भावना त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील समर्पितांनी  अत्यंत परखडपणे लावून धरली होती. परंतु संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील समर्पितांची   वेदना आजही कायम आहे. असे प्रतिपादन बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष श्रीमती कोमल साळुंखे यांनी केले. काळमाथा तालुका औसा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बालाजी मोहिते हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, डॉ. देवणीकर, नगरसेविका मंजुषा हजारे, अंगद कांबळे, सतीश शिंदे, लहुजी शक्ती सेनेच्या माया लोंढे, व्यंकट रसाळ, राष्ट्रवादी ग्रंथालय संघाचे बालाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना कोमल ताई साळुंखे म्हणाल्या की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरी आणि पोवाडा च्या माध्यमातून समाजातील शोषित पीडित व उपेक्षितांचा आवाज बुलंद करण्याचे कार्य केले. संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पाहणाऱ्या चळवळीतील समरपितांना बेळगाव निपाणी कारवार हा प्रदेश कर्नाटक राज्यात गेल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राचे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. याचे शल्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी 'माझी मैना गावाकडे राहिल ' या रूपकात्मक छक्कड मधून आपल्या व्यथा व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्र प्रांत हा खंडित झाल्याचे दुःख संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील नेत्यांचे कायम राहिल्याची व्यथा आपल्या विविध साहित्य पुस्तके पोवाडे आणि शाहिरीच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी समाजासमोर मांडले. अण्णाभाऊ साठे यांचे विचार आत्मसात करून दलित समाजाने विकासाची कास धरली पाहिजे असेही शेवटी त्यांनी स्पष्ट केले. यावेळी डॉ. देवणीकर यांनी आपल्या परखड वाणीतून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाचे उपाध्यक्ष संतोष सोमवंशी यांनी बोलताना अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे अशी मागणी लावून धरली. या अत्यंत उत्कृष्ट नियोजन केलेल्या जयंती कार्यक्रमांमध्ये काळमाथा, बोरगाव, कवठा, भादा व परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक संपतराव गायकवाड यांनी जयंती निमित्त गावात 150 वृक्षाची लागवड केल्याच्या कार्याचे सर्वांनी कौतुक केले. याच कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  ओमप्रकाश हजारे, अँड. रुईकर, सिद्धार्थ रसाळ यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments