सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त औसा शहरात पोलिसांचे पथसंचलन
 औसा प्रतिनिधी
 मागील दोन वर्ष कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आला. परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध हटविल्यामुळे गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार असल्यामुळे औसा शहर व तालुक्यातील सर्व गणेश मंडळांनी गणेश उत्सव अत्यंत थाटात साजरा करण्याचे ठरविले आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक 29 ऑगस्ट रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर पवार, पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना देण्यात आल्या. पोलीस स्टेशन मधून रितसर परवानगी घेऊनच सर्व नियमाचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा अशा सूचना गणेश भक्तांना देण्यात आल्या. याच पार्श्वभूमीवर दिनांक 30 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी औसा शहरातील मुख्य रस्त्यावरून पोलिसांचे पथसंचलन काढण्यात आले. श्री गणेश मूर्तीची स्थापना करून गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत पावित्र राखून व शासकीय नियमाचे पालन करून गणेश भक्तांनी हर्ष उल्हासामध्ये गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. पोलीस प्रशासन आपणास सर्वतोपरी बंदोबस्त व सहकार्य देईलच परंतु आपणही श्री गणेश मूर्तीची स्थापना केल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी रहदारीला अडथळा न येऊ देता आणि कोणतेही गालबोट न लागू देता गणेशोत्सव साजरा करण्याचे पोलिसांनी आवाहन केले. औसा शहरातून पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पथसंचलन केले. या संचलनामध्ये औसा पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments