वाचनालयाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून धमकी दिल्याची पोलिसात तक्रार 
औसा प्रतिनिधी 
औसा तालुक्यातील फत्तेपूर येथील कै. द्रोपदीबाई सार्वजनिक वाचनालयाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची औसा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील फत्तेपूर येथील कै. द्रोपदीबाई सार्वजनिक वाचनालय हे जिल्हा परिषदेच्या जागेतील इमारतीत सुरू आहे. वाचनालयासाठी लातूर जिल्हा परिषदेचा ठराव क्रमांक 27 77 दिनांक 17 2014 अन्वये ठराव घेऊन या जागेची आठ अ च्या उताऱ्यावर वाचनालयाच्या नावे भोगवटादार रकान्यात नोंद केली आहे. जिल्हा परिषदेची ही जागा व्यवस्थित राहावी म्हणून या जागेत संस्थेने वाचनालय सुरू केले असून या वाचनालयाच्या जागेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वजारोहण करण्यासाठी ध्वजारोहण कट्टा बांधकाम करीत असताना येथील प्रथमेश साळुंखे पाटील, नितीन जनक कदम, अविनाश खंडाळे व जितू धानोरे या फत्तेपूर येथील ग्रामस्थांनी ध्वजारोहण कट्ट्याची  मोडतोड करून बांधकाम साहित्य इतरत्र फेकाफेकी करून अडथळा निर्माण केला आहे. सदर प्रकरणी दिनांक 18 मार्च 2022 रोजी संस्थेच्या वतीने पोलिसात तक्रार दिली होती परंतु अद्याप उपरोक्त लोकांवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. कै. द्रोपदी बाई सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण कट्टा बांधकाम करीत असताना दिनांक 10 व 11 ऑगस्ट रोजी उपरोक्त चार जणांनी वाचनालयाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली असून सदर घटनेची सविस्तर चौकशी करून दोषींवर  योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी सौ सुरेखा नागोराव माळी अध्यक्ष, कै द्रोपदीबाई सार्वजनिक वाचनालय फत्तेपूर यांनी पोलीस निरीक्षक औसा यांच्याकडे दिलेल्या तक्रारी अर्जाद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments