शिक्षण घ्या पण फक्त नोकरी मिळवण्यासाठी नाही तर सक्षम होण्यासाठी-प्रा.डॉ.मंगला कठारे

 शिक्षण घ्या पण फक्त नोकरी मिळवण्यासाठी नाही तर सक्षम होण्यासाठी-प्रा.डॉ.मंगला कठारे 



ऑर्बिट प्री-प्रायमरी इंग्रजी शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न.


डॉ.मंगला कठारे मॅडम यांनी पहिली मुस्लिम शिक्षिका फातेमा शेख व सुलतानी फरीदा बाजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण देऊन एकात्मतेचा संदेश दिला.


औसा (प्रतिनिधी) ऑर्बिट प्री-प्रायमरी इंग्रजी शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.ज्यामध्ये महिलांचे शिक्षण आणि सुरक्षा,मुलांच्या शिक्षणात आईची भूमिका आणि पालकत्व.हिजाब आणि बुरख्याचे महत्त्व या विषयावर व्याख्याने आणि महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.मंगला कठारे,सुलतानी फरीदा,पटेल रझिया,शेख हनीफा,आलेमा शेख तबस्सुम,डॉ.सफुरा तजीन सय्यद, डॉ.सुलतानी गुलनाज आणि डॉ.जबीन पठाण आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात कूरआन पठण ने करण्यात आली.सुरुवातीला शाळेतील विद्यार्थ्यांनी बयान,हदीस व नात सादर केली.शैक्षणिक सेवेदरम्यान अथक परिश्रम, शिक्षण, प्रेम, समाजसेवा, जिद्द आणि समर्पित अष्टपैलुत्वाचा लाभ केवळ विद्यार्थ्यांनाच नाही तर संपूर्ण समाजाला झाला आहे.यांच्या या सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्वाला रेखांकित करून महेताबसाब पटवारी सोसायटी तथा राहत मेडिकल फाऊंडेशन यांच्या वतीने राहत जीवन गौरव पुरस्कार 2022 देऊन प्रा.डॉ.मंगला कठारे,सुलतानी फरीदा,पटेल रजिया,शेख हनीफा यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ.प्रा.मंगला कठारे यांनी महिलांना शिक्षण आणि सुरक्षितता या विषयावर मार्गदर्शन करताना महिलांच्या शिक्षणातच तिची सुरक्षा आहे असे सांगितले.तसेच सावित्रीबाई फुले यांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहिलेल्या मुस्लीम महिला शिक्षिका फातिमा शेख यांनी हि महिलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला. महिलांना शिक्षण घेण्यासाठी कोणतेही बंधन नसावे.शिक्षणाचा कधीही नोकरीशी संबंध जोडणे योग्य नाही,शिक्षण घ्या,परंतु केवळ नौकरी मिळवण्यासाठी नाही तर सक्षम होण्यासाठी.त्यानंतर सुलतानी फरीदा बाजी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,मुलांच्या शिक्षण व संगोपनात आईची भूमिका काय असते.इस्लाममध्ये आईला सर्वोच्च स्थान दिलेले आहे आणि मुलाच्या पालकत्वात आईची भूमिका सर्वात महत्वाची आहे.आपण आपल्या मुलांना चांगले शिक्षण देतो,परंतु त्यांना चांगले प्रशिक्षण देणे सर्वात महत्वाचे आहे.पुढे फरिदा बाजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊंचे उदाहरण देत सांगितले की,जिजाऊ आईने छत्रपती शिवाजी महाराजांना कसे मोठे केले,त्यांच्या लहानपणापासून त्यांना शूरवीरांच्या गोष्टी सांगायच्या.मुलांचे संगोपन प्रेमाने व आपुलकीने करा, त्यांचे निर्णय व आदेश त्यांच्यावर लादू नका असे सुलतानी फरीदा बाजी यांनी आपले विचार व्यक्त केले.तदनंतर आलेमा शेख तबस्सुम बाजी यांनी हिजाब आणि बुरख्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकताना सांगितले की,इस्लाममध्ये महिलांना बुरख्याचे महत्त्व समजावून सांगितले आहे, अल्लाह तआलाने कुराणमध्ये बुरख्याचे आदेश दिले आहेत आणि त्याचे पालन करणे प्रत्येक मुस्लिमावर आहे.इस्लाम मध्ये स्त्रीला खूप महत्व दिले आहे आणि तिला मौल्यवान बनवले आहे.म्हणूनच मौल्यवान वस्तू नेहमी पडद्यात ठेवल्या जातात आणि चोरांसाठी उघड्या ठेवल्या जात नाहीत.शेवटी पटेल रझिया बाजी यांनीही मार्गदर्शनपर भाषण केले व समाजात प्रत्येक कार्य स्त्रीच्या खांद्याला खांदा लावून कशी पार पाडता येते ते सांगितले.त्यानंतर महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले त्यात ४० महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.या कार्यक्रमास लहान मुले व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्या शेख अंजुम नेहा यांनी केले तर आभार नसरीन रहिमोद्दीन शेख यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुमैया पटेल,आयेशा शेख,अमन शेख,परवेज शेख, झिनत बागवान अर्शिया शेख तसेच राहत मेडिकल फाउंडेशनचे सचिव अरबाज शेख आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments