निम्न तेरणा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीस उपस्थित राहून महत्वपूर्ण मुद्दे मांडले.

 निम्न तेरणा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीस उपस्थित राहून महत्वपूर्ण मुद्दे मांडले.


लातूर

आज जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे पालकमंत्री मा ना श्री अमितजी विलासरावजी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली निम्न तेरणा कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीस उपस्थित राहून "माकणी प्रकल्पाच्या खालील बाजूपासून शहाजनी औराद पर्यंत नदीपात्राचे खोलीकरण व सरलीकरण करण्याचे माझे नियोजन आहे, त्यासाठी अंदाजपत्रकही तयार करून घेतले आहे. जैन संघटना, आर्ट ऑफ लिव्हिंग सारख्या संघटना यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासही तयार असून इंधनासाठी जवळपास ३ कोटी रुपये खर्च येणं अपेक्षित आहे. जवळपास ४० किमी लांबीच्या नदीपात्राचे खोलीकरण झाल्यास हजारो शेतकऱ्यांना दूरगामी फायदा होणार असून यासाठी मी १ कोटी रुपयांचा माझा आमदार निधी देण्यास तयार असून उर्वरित निधीची जिल्हा नियोजन निधीअंतर्गत तरतूद करण्यात यावी" अशी आग्रही मागणी मी यावेळी केली. माझ्या या मागणीला मा पालकमंत्र्यांनी सहमती दर्शवत तत्त्वता मान्यता दिली आहे.


माकणी येथे प्रकल्पाच्या शिल्लक जमिनीवर पैठणच्या धर्तीवर पर्यटनाला चालना देण्यासाठी उद्यान विकसित करण्यात यावे या माझ्या मागणीचा बैठकीत पाठपुरावा केला असता याबाबत ३ महिन्यांच्या आत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मा पालकमंत्री यांनी संबंधितांना दिले आहेत. माकणी धरणात जमा झालेल्या प्रचंड गाळामुळे पाणी साठवण क्षमता सुमारे ४० टक्क्यांनी कमी झाली असून माकणी धरणातील गाळाचे सर्वेक्षण करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी, गाळामुळे वाहून जाणारे पाणी पुनर्स्थापित करण्यासाठी औसा व निलंगा तालुक्यात नवीन साठवण तलावांची कामे करण्याबाबत कारवाई करण्यात यावी तसेच निम्न तेरणा प्रकल्पातील पाणी शिल्लक राहत असल्याने प्रकल्पाचा कमांड एरिया वाढवून नवीन कालवे/कॅनॉल तयार करण्यासंदर्भातील व्यवहार्यता तपासून प्रस्ताव सादर करण्यात यावा आदी मागण्याही या बैठकीत केल्या.


"सर्व कालव्यांची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव सादर करण्यात यावा, ५०% शेतकऱ्यांनी मागणी केल्यास पाणी सोडण्यात यावे, कोकळगाव - सरवडी व सारणी - सास्तूर - माकणी रस्त्यांची कामे करण्यासाठी आवश्यक एनओसी देण्यात यावी, पाण्याखाली गेलेल्या किल्लारी - एकोंडी शेतरस्त्याचे व पुलाचे काम करण्यात यावे, राजेगाव - किल्लारी रस्त्यावर पुलाचे काम करण्यात यावे, ७०% पेक्षा अधिक पदे रिक्त असून त्याबाबतचा अहवाल मागवून उचित कारवाई करण्यात यावी तसेच आशिव येथील १०० हेक्टर पेक्षा अधिक शेती क्षेत्रावर प्रकल्पाच्या बॅकवॉटरचे पाणी थांबून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून प्रकल्पासाठी संपादित जमिनीची मोजणी करून सीमांकन करावे आणि आशिव येथील पाणी थांबत असलेल्या शेतजमिनीच्या संपादनासाठी कार्यवाही करण्यात यावी" आदी आग्रही मागण्याही या बैठकीत केल्या. मी मांडलेल्या सर्वच मागण्या शेतकरी हिताच्या असून त्या तडीस नेण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच राहणार आहे.


या बैठकीला धाराशिवचे खासदार श्री ओमप्रकाशजी राजेनिंबाळकर, आ. श्री ज्ञानराजजी चौगुले, आ. श्री धीरजजी देशमुख, आ. सौ नमिताताई मुंदडा, आ. श्री कैलासजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे, मनपा आयुक्त श्री अमन मित्तल, अधीक्षक अभियंता श्री म्हेत्रे, कार्यकारी अभियंता श्री रोहित जगताप, कारखान्यांचे प्रतिनिधी व संबंधित विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments