औशाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर गायब असल्याने पशुपालकांची दैना !
औसा (प्रतिनिधी) औसा येथे पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये गुरुवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी सकाळपासून येथील डॉक्टर गायब असल्याने पशुपालकांची दैन्यावस्था झाली. पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात 20 ते 25 गाई म्हशी वासरे बैल घेऊन अनेक शेतकरी पशुपालक व महिला आल्या असता पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये डॉक्टर,कंपाउंडर कोणीही उपलब्ध नसल्यामुळे आजारी जनावरांवर उपचार करण्यासाठी पशुपालक शेतकरी संतापले होते. बराच वेळ या ठिकाणी चौकशी केली असता डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे पशुपालक संतप्त झाले होते. दवाखान्याच्या आवारात पशुपालकांनी आपली जनावरे बांधून आजारी जनावरांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची प्रतीक्षा करावी लागली .येथील पशुवैद्यकीय दवाखाण्यात फिरते पशुचिकित्सालयाचे वाहन थांबून आहे.फ़िरते पशुचिकित्सालय हे फक्त नावालाच असून मोठ्या थाटामाटात उद्घाटन करूनही गैरसोय सुरुच आहे. ग्रामीण भागातून व शहरातून अनेक आजारी जनावरांना उपचार करण्यासाठी अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जनावरांना साथीचे रोग आलेले आहेत.तसेच काही माजावर आलेल्या गाई,म्हशी यांना इंजेक्शन देण्यासाठी आलेल्या पशुपालकांना मात्र गैरसोईला तोंड देण्याची पाळी आली. याकामी संबंधितांनी वेळीच लक्ष घालून पशुपालकांच्या आजारी जनावरावर उपचार करण्यासाठी पशु वैद्यकीय डॉक्टरांची ठरलेल्या वेळेत व्यवस्था करावी, आणि गुरुवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी गैरहजर असलेल्या पशुवैद्यकीय डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.
0 Comments