केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत लातूरचा झेंडा ! महापौरांनी घरी जाऊन केला विद्यार्थ्यांचा सत्कार

 केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत लातूरचा झेंडा !


महापौरांनी घरी जाऊन केला विद्यार्थ्यांचा सत्कार 


लातूरकरांची मान उंचावणारी कामगिरी-महापौर विक्रांत गोजमगुंडे लातूर/प्रतिनिधी: शिक्षण क्षेत्रात लातूर पॅटर्नचे बिरुद मिरवत असताना शहरातील व जिल्ह्यातील गुणवंतांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही लातूरचा झेंडा रोवला आहे.या यशाबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी घरी जाऊन यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. समस्त लातूरकरांची मान अभिमानाने उंचावणारी ही कामगिरी असल्याचे ते म्हणाले.

    केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत लातूर येथील विनायक महामुनी यांनी देशात ९५वा रँक पटकावला.कमलकिशोर कंडारकर यांनी १३७ वा, निकिता संजय जगताप यांनी १९९ वा,शुभम स्वामी यांनी ५२३ वा तर निलेश गायकवाड यांनी देशात ६२९  वा रॅंक मिळवला.

  लातूर हे गुणवत्तेची खाण असल्याचे या गुणवंतांनी सिद्ध केले.या माध्यमातून लातूर पॅटर्नला त्यांनी नवी ओळख मिळवून दिली. केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नाही तर स्पर्धा परीक्षेत देखील लातूर पॅटर्न आता झळाळी घेऊ लागला आहे. शहराचा प्रथम नागरिक म्हणून याचा आपल्याला अभिमान वाटतो.समस्त लातूरकरांची मान अभिमानाने उंचावणारी ही कामगिरी असल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यावेळी म्हणाले.

   महापौर गोजमगुंडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेत सत्कार केला.नगरसेवक आयुब मणियार यांची त्यांच्यासमवेत उपस्थिती होती.विनायक महामुनी, कमलकिशोर कंडारकर यांना त्यांनी घरी जाऊन सन्मानित केले.शुभम स्वामी हे दिल्लीतच असल्याने त्यांच्या आई-वडिलांचा महापौरांनी सत्कार केला.मुलांनी मिळवलेल्या यशात आई-वडिलांचा मोठा वाटा आहे.आई-वडील हे सर्वथा सन्माननीय असल्याचे ते म्हणाले.

   या गुणवंतांच्या हातून निरंतर लोकसेवा घडावी.

त्यांच्या प्रशासकीय कामगिरीमुळे लातूरचा देश पातळीवर नावलौकिक व्हावा,अशी प्रार्थना आपण ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर चरणी करत असल्याचेही ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments